Belagavi

बेळगावात मार्केट पोलिसांची कारवाई; चाकूसह एकाला अटक, मटकाप्रकरणी दोघे ताब्यात

Share

बेळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मार्केट पोलिसांनी कारवाई केली. सेंट्रल बसस्थानकाजवळ चाकूसह फिरणाऱ्या एकाला, तर दोन वेगवेगळ्या मटका अड्ड्यांवर छापे टाकून दोघांना अटक करण्यात आली.

२४ नोव्हेंबर २०२६ रोजी मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत अँटी स्टॅबिंग स्क्वॉडने तपासणी केली. यावेळी सेंट्रल बसस्थानकाजवळ सार्वजनिक ठिकाणी धारदार चाकू बाळगून फिरणाऱ्या महाद्वार रोड येथील मयूर सुभाष राऊत (३२) याला पीएसआय पी. जी. गंडव्वगोळ आणि त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून चाकू जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात आली.

दुसऱ्या कारवाईत रविवार पेठेतील सिद्धामेश्वर अॅग्रो सेंटरसमोर सुरू असलेल्या मटका खेळावर छापा टाकण्यात आला. यावेळी कामत गल्ली येथील पंकज मोहन जाधव (३४) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १ हजार २५० रुपये रोख आणि मटका चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या.

तसेच कोतवाल गल्लीतील सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकून बंजार गल्ली येथील मुद्दस्सर मेहबूब देसाई (३४) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून २ हजार ३४० रुपये रोख आणि मटका चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. या दोन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल करून तपास सुरू आहे.

या कारवाया करणारे पीएसआय पी. जी. गंडव्वगोळ आणि त्यांच्या पथकाचे पोलीस आयुक्त व डीसीपी यांनी कौतुक केले.

Tags: