Belagavi

बेळगाव महापालिका आयुक्तांकडे महसूल कर्मचाऱ्यांचे साकडे

Share

बेळगाव महापालिकेच्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी संघटनेने विविध मागण्यांसाठी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. दुरुस्ती, पीआयडी आणि ई-आस्ती लॉगिन अधिकार पुन्हा सुरू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

महापालिकेच्या महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना आपली नियमित कामे सुरळीत पार पाडता यावीत, यासाठी लॉगिन अधिकार पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे. सॉफ्टवेअरमधील बदलांमुळे प्रत्येक दुरुस्ती अर्ज मंजुरीसाठी उपायुक्तांच्या लॉगिनवर पाठवावा लागत आहे. त्यामुळे अर्जांच्या निपटाऱ्यात विलंब होत असून नागरिकांकडून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली जात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

महसूल निरीक्षक आणि कर वसुली कर्मचाऱ्यांचे लॉगिन अधिकार काढून घेतल्याने क्षेत्रीय स्तरावरील महसूल कामकाज ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. तसेच तांत्रिक त्रुटींची जबाबदारी येण्याची भीतीही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे कर्नाटक महानगरपालिका अधिनियम १९७६ मधील तरतुदींनुसार महसूल निरीक्षक आणि कर वसुली कर्मचाऱ्यांचे लॉगिन अधिकार पूर्ववत करावेत. तसेच दक्षिण विभागात तातडीने संगणक ऑपरेटर नियुक्त करावेत, अशी मागणी संघटनेने आयुक्तांकडे केली आहे.

Tags: