डिसेंबरमध्ये होणाऱ्या बेळगाव विधिमंडळ अधिवेशनाच्या तयारीसाठी काढण्यात आलेल्या निविदांमध्ये स्थानिक कंत्राटदारांना डावलले जात असल्याचा आरोप आमदार अभय पाटील यांनी केला आहे. बाहेरील कंत्राटदारांना प्राधान्य दिले जात असल्याने या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिवेशनाच्या मंडप, रस्ते आणि भोजन व्यवस्थेच्या कंत्राटांमध्ये स्थानिक कंत्राटदारांना संधी मिळत नसल्याची तक्रार संबंधित कंत्राटदारांनी केली आहे. केटीपीपी कायद्याचा गैरवापर करून निवडक कंत्राटदारांना कामे दिली जात असून, यामध्ये काही अधिकारीही सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी बोलताना अभय पाटील यांनी, बेळगावमध्ये अधिवेशन होऊनही स्थानिकांना त्याचा लाभ मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित केला. अधिवेशनाची तारीख निश्चित होऊन महिना उलटला तरी अल्पमुदतीच्या निविदा का काढण्यात आल्या नाहीत, अशी विचारणाही त्यांनी केली.
निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवून कमी दराने निविदा सादर करणाऱ्यांना कंत्राटे द्यावीत. अन्यथा या प्रक्रियेतील गैरव्यवहाराच्या आरोपांना बळ मिळेल, असे आमदार अभय पाटील यांनी म्हटले.


Recent Comments