बेळगावच्या कणबर्गी येथील बुडाच्या भूसंपादन आणि रस्ते बांधकामाचा वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुपीक जमिनीवर शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय रस्ते बांधले जात असल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांनी काम तातडीने थांबवून जमिनीची फेरमोजणी करण्याची मागणी केली आहे.

२००७ मध्ये १६० एकर सुपीक जमिनीच्या भूसंपादनासाठी नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, शेतकऱ्यांची संमती नसतानाही सुमारे १५ एकर जमिनीवर रस्ते बांधण्यात आल्याचा आरोप श्री सिद्धेश्वर शेतकरी संघटनेचे प्रमुख बबन मलायी यांनी केला. स्वेच्छेने संमती दिलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कामाला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, न्यायालयात प्रलंबित असलेल्या २५ एकर जमिनीवरील तसेच सर्व्हे क्रमांक ५००, ५०२, ५११, ५१३ आणि ५१४ मधील रस्त्यांची कामे थांबवण्याची मागणी त्यांनी केली.

याशिवाय, ३० वर्षांपूर्वी बांधलेली २९० घरे नियमित करण्याचे आश्वासन आमदार आसिफ सेठ आणि बुडाच्या अध्यक्षांनी दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. शेतकरी उदय सावकार यांच्या १६ गुंठे जमिनीच्या मोबदल्यापोटी जमा केलेले चार लाख रुपये परत घेऊन त्यांची जमीन त्यांना कायम ठेवू द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी शेतकरी नेते बबन मलायी यांनी कंत्राटदारांच्या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त केली.
कणबर्गी येथील ६१ क्रमांकाच्या योजनेअंतर्गत संमती दिलेले आणि मोबदला निश्चितीच्या प्रक्रियेत असलेले शेतकरी एकत्र आले. यावेळी शेतकरी नेते शिवाजीराव सुंठणकर यांनी, यापूर्वी शेतकऱ्यांमध्ये तीन गट पाडण्यात आले होते; मात्र आता अशोक नाईक आणि बबन मलायी यांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकरी एकत्र आले असल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रत्येक इंच आणि त्यांच्या घरांचे संरक्षण झाले पाहिजे. शेतकरी अनुपस्थित असताना कोणतीही कारवाई करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. मागण्या मान्य होईपर्यंत बुडाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही पुढील कार्यवाही करू नये. सर्व शेतकऱ्यांना एकत्र बसवून पुन्हा बैठक घ्यावी आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवाजीराव सुंठणकर यांनी केली.


Recent Comments