संत बसवेश्वर यांचे व्यक्तिमत्त्व कलंकित करून त्यांना खलनायक, खुनी आणि भ्रष्टाचारी ठरविण्याचा प्रयत्न निषेधार्ह असल्याचे माजी आमदार प्रा. राजू अलगूर यांनी सांगितले. रवी हंज आणि पुस्तकाचे प्रकाशक विश्वेश्वर भट यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
विजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमेरिकेचे नागरिकत्व असलेल्या रवी हंज यांनी लिहिलेल्या ‘बसव मंटप’ या पुस्तकात बसवेश्वरांनी खजिन्याची लूट केली आणि बिज्जळ राजाच्या हत्येला कारणीभूत ठरल्याचे आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप निराधार असून त्यातून बसवेश्वरांच्या व्यक्तिमत्त्वाला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रा. अलगूर यांनी सांगितले.

संत बसवेश्वरांनी वचनांच्या माध्यमातून चोरी, हत्या, असत्य आणि अन्यायापासून दूर राहण्याचा संदेश दिला. बाराव्या शतकातच त्यांनी जातिभेदाला विरोध करून समानता, मानवता आणि महिलांच्या सामाजिक सन्मानाचा पुरस्कार केला. अनुभव मंटपाच्या माध्यमातून सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व दिले, असे त्यांनी स्पष्ट केले.
या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल विश्वेश्वर भट यांचाही निषेध करत, रवी हंज यांच्याप्रमाणेच प्रकाशकांवरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
रवी हंज यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व असल्याने कायदेशीर कारवाईत तांत्रिक अडचणी येण्याची चर्चा आहे. त्यामुळे अमेरिकेतील भारतीय दूतावास आणि अमेरिकन सरकारच्या निदर्शनास हा विषय आणून योग्य कारवाईसाठी पाठपुरावा करावा, असेही प्रा. अलगूर यांनी सुचविले.
संत बसवेश्वर हे समानता, विवेक आणि महिला सन्मानाचे प्रतीक आहेत. बुद्ध, बसवेश्वर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांचा अवमान करण्याचे प्रयत्न निषेधार्ह आहेत. बसवेश्वरांच्या अनुयायांनी जात, धर्म आणि पक्षभेद बाजूला ठेवून अशा प्रकारांविरोधात एकत्रित आवाज उठवावा, असे आवाहन प्रा. राजू अलगूर यांनी केले.
पत्रकार परिषदेला अहिंदचे नेते सोमनाथ कळ्ळीमनी आदी उपस्थित होते.


Recent Comments