अथणीत प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार रमेश जारकिहोळी यांनी लक्ष्मण सवदी यांच्या वक्तव्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. स्वतंत्र जिल्ह्यांच्या मागणीसह जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

लक्ष्मण सवदी सहकारमंत्री झाल्यानंतर आपण अथणीला आलेलो नाही, हे विधान चुकीचे असल्याचे जारकिहोळी यांनी सांगितले. आपण कोणालाही घाबरणारे नाही, असे स्पष्ट करत पद आणि प्रतिष्ठेसाठी इकडून तिकडे जाण्याऐवजी एकाच ठिकाणी राहून पक्षासाठी काम करणे ही आपली भूमिका असल्याचा टोला त्यांनी सवदी यांना लगावला. अथणी आणि बैलहोंगल स्वतंत्र जिल्हे करण्याची मागणी करण्याचे स्वातंत्र्य सवदी यांना आहे; मात्र सरकारने याबाबत स्पष्ट निर्णय घेऊन संभ्रम दूर करावा, असेही ते म्हणाले.

बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाबाबत बोलताना गोकाक स्वतंत्र जिल्हा करण्याच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चिक्कोडीच्या बाबतीत सरकार जो निर्णय घेईल, त्याचे आपण स्वागत करू, असेही ते म्हणाले. पक्ष वेगळे असले तरी सिद्धरामय्या हे आपले नेते आहेत, असे सांगत मागासवर्गीय नेत्यांना बाजूला सारल्यास जनता त्याला उत्तर देईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. सावलगी येथील कार्यक्रमात कत्ती कुटुंबाबाबत केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना रमेश कत्ती आणि उमेश कत्ती यांच्याबाबतचे आपले वक्तव्य केवळ विनोदाचा भाग होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
उन्हाळ्यात चिक्कोडीसह जिल्ह्यातील विविध भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास महाराष्ट्रातून पाणी आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. २०२८ च्या निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पक्षातून निलंबित आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांना पुन्हा पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू असून लवकरच चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्या भावाच्या घरावरील ईडी आणि आयकर विभागाच्या धाडी या सामान्य बाबी असल्याचेही ते म्हणाले. कावेरी नदीच्या पाणीवाटपाबाबत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्रीय मंत्र्यांनी बैठक घेऊन जुन्या करारांचा फेरआढावा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.


Recent Comments