Belagavi

बेळगावात कर्नाटकवादी ठरावाचा जल्लोष; एच. के. पाटील यांच्याकडून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ

Share

बेळगाव महापालिकेतील कर्नाटक समर्थक ठरावाचे समर्थन करत मंत्री एच. के. पाटील यांनी सीमाभागातील कन्नडवादी आंदोलनाचे कौतुक केले. बेळगावात कर्नाटकच्या बाजूने ठराव मंजूर करून घेण्यासाठी संघर्ष करावा लागल्याचे सांगत त्यांनी या ठरावासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रशंसा केली.

बेळगाव जिल्हा कन्नड संघटनांच्या कृती समितीतर्फे शिवबसवनगर येथील एस.जी.बी.आय.टी. शिवकुमार संबरगीमठ सभागृहात हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बोलताना मंत्री एच. के. पाटील यांनी जमीन, पाणी आणि भाषेच्या प्रश्नावर बेळगाव महापालिकेत कर्नाटकच्या बाजूने ठराव मंजूर करण्यासाठी सहा महिने संघर्ष करावा लागल्याचे सांगितले. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भूमिकेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सरकार मूकदर्शक राहिले; मात्र चंद्रगौडा यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन कन्नड भाषिकांचे संरक्षण केल्याचे त्यांनी नमूद केले.

सरकारी कन्नड शाळा खासगी संस्थांकडे सोपवण्यास विरोध करताना, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी असलेल्या शाळा बंद करणे योग्य नसल्याचे पाटील म्हणाले. बेळगाव, हुबळी, गदग, विजापूर आणि बागलकोटसारख्या कन्नड भाषिक भागांतच शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. आगामी विधिमंडळ अधिवेशनात राज्यातील एकही कन्नड शाळा बंद करू नये, असा स्पष्ट ठराव करण्याची मागणी त्यांनी केली.

सीमाप्रश्नाबाबत सध्या चिंता नसली, तरी जलवाटप, भाषा आणि नदीच्या पाण्याच्या प्रश्नांत राज्याला मोठी पिछाडी मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले. कृष्णा नदीच्या पाणीवाटपाबाबत निर्णय होऊनही न्यायालयाची स्थगिती नसताना अधिसूचना जारी झालेली नाही आणि केंद्राची पर्यावरणविषयक मंजुरीही मिळालेली नाही, असे त्यांनी नमूद केले. कृष्णा, तुंगभद्रा आणि म्हादई नद्यांचे पाणी उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचल्यास त्यांच्या जीवनात मोठा बदल होईल, असेही ते म्हणाले.

नागनूर रुद्राक्षीमठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामीजी यांच्या सान्निध्यात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ एस. एम. कुलकर्णी होते.

Tags: