Belagavi

संत बसवेश्वरांच्या अवमानप्रकरणी लिंगायत समाजाचे बेळगावात आंदोलन

Share

‘बसव मंटप’ या पुस्तकात संत बसवेश्वर आणि वचन साहित्याबाबत अवमानकारक लिखाण केल्याचा आरोप करत बेळगावात लिंगायत समाजाने आंदोलन केले.

नागनूर रुद्राक्षी मठ आणि अथणी मोटगी मठाच्या स्वामीजींच्या नेतृत्वाखाली जागतिक लिंगायत महासभेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून लेखक रवी हंजी आणि खासगी वृत्तपत्राच्या संपादकांवर कारवाईची मागणी केली.

अनिवासी भारतीय लेखक रवी हंजी यांनी ‘बसव मंटप’ पुस्तक आणि एका मुलाखतीत बसवादी शिवशरण तसेच लिंगायत समाजाबाबत आधारहीन आरोप केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू स्वामीजी आणि अथणी मोटगी मठाचे प्रभुचन्नबसव स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले. यावेळी लेखक रवी हंजी आणि पुस्तकाचा प्रसार केल्याचा आरोप असलेले खासगी वृत्तपत्राचे संपादक विश्वेश्वर भट यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

पुस्तक जप्त करून गुन्हा दाखल केल्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोटी यांनी या प्रकरणामागे मोठे षड्यंत्र असल्याचा आरोप केला. यामध्ये केवळ दोघांचाच सहभाग नसून, यामागील सूत्रधार आणि चिथावणीखोरांचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी केली. महापुरुषांबाबत अवमानकारक लिखाण झाल्यास स्वतःहून तक्रार दाखल करण्यासाठी स्वतंत्र दक्षता पथक स्थापन करण्याची मागणीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे केली.

भाजप नेते मुरुघेंद्रगौडा पाटील यांनीही संत बसवेश्वरांचा इतिहास पुसण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिल्याचा आरोप केला. केवळ गुन्हा दाखल करून लिंगायत समाजाची समजूत काढण्याचा प्रयत्न करू नये, तर संबंधितांना तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. उद्यापर्यंत अटक न झाल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनात अशोक बेंडिगेरी, अशोक मळगली, मुरुगेश शिवपूजी, सुरेश नरगुंद, संतोष गुडस, राजू कुंदगोळ, सी.एम. बुदिहाळ, ईरण्णा देयन्नवर, एस.जी. सिद्नाळ, आनंद गुडस, सूर्यकांत भावी, डॉ. एस.एम. दोड्डमनी, मुरिगेप्पा बाळी, शंकर गुडस, शिवानंद मेट्याळ आणि बी.आर. पोलीस पाटील यांच्यासह लिंगायत समाजातील विविध पदाधिकारी सहभागी झाले होते.

Tags: