Belagavi

वाहनांचे इंजिन बिघडत असल्याच्या तक्रारींनंतर बेळगावात पेट्रोलच्या गुणवत्तेची तपासणी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Share

पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणामुळे वाहनांचे इंजिन बिघडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बेळगाव शहरातील तीन पेट्रोल पंपांवरील पेट्रोलचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

गुरुवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, तेल विपणन कंपन्यांकडून पुरवठा होणारे पेट्रोल निर्धारित गुणवत्ता आणि मानकांनुसार असणे आवश्यक आहे. मात्र, पेट्रोलमधील इथेनॉलच्या मिश्रणामुळे वाहनांचे इंजिन बिघडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत.

या तक्रारींची गंभीर दखल घेत शहरातील तीन पेट्रोल पंपांवरून काळजीपूर्वक पेट्रोलचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पेट्रोलच्या गुणवत्तेत त्रुटी आढळल्यास संबंधित पेट्रोल पंपांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पेट्रोलच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून तपासणी सुरू असून, प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Tags: