Belagavi

बेळगावात पाणीकपातीचे संकेत; जिल्हाधिकाऱ्यांचा कृती आराखडा

Share

बेळगाव जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरी भागातील पाणीवापर कमी करण्यासह नदीकाठच्या परिसरातील वीजकपात वाढवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

सध्या हिप्परगी बॅरेजमध्ये २.५ टीएमसी, तर मलप्रभा जलाशयात १४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. शेतीसाठीचा पाणीपुरवठा बंद करून केवळ पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. पाण्याचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी नदीकाठच्या भागात सध्या आठवड्यातून दोन दिवस केली जाणारी वीजकपात तीन दिवसांपर्यंत वाढवण्याचा विचार सुरू आहे. जूनपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मलप्रभा नदीतून धारवाड, बैलहोंगल, सवदत्ती आणि रोन शहरांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी दररोज २०० ते २५० क्युसेक्स पाणी उपसा केले जात आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर आणि पुनर्वापर या तत्त्वानुसार शहरी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचा वापर १० टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

Tags: