Belagavi

महागाई, कर वाढ आणि एसआयआरला विरोध; भाजपचे बेळगावात भव्य आंदोलन

Share

राज्य सरकारच्या महागाई आणि कर वाढीच्या धोरणांविरोधात तसेच एसआयआर प्रक्रियेवरून काँग्रेसच्या भूमिकेविरोधात बेळगावात भाजपच्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन करण्यात आले. राणी चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल बेनके यांनी बसभाडे, दूध दर, वीज शुल्क, आरटीओ शुल्क, मालमत्ता हस्तांतरण आणि ट्रान्सफॉर्मर शुल्कात १५ ते २० टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचा आरोप केला. जनतेकडून ६० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी जमा करूनही विकासकामे होत नसल्याचा तसेच गॅरंटी योजनांचाही लाभ नागरिकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचत नसल्याचा दावा त्यांनी केला. राज्य सरकारने तातडीने वीज आणि डिझेलचे दर कमी करावेत, अन्यथा जनतेला सरकारविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनीही दूध दर, बसभाडे, नवीन इमारतींची नोंदणी तसेच मद्य आणि उत्पादन शुल्कातील वाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाची एसआयआर (मतदार यादीची विशेष सखोल पुनर्पडताळणी) प्रक्रिया ही मतदारांचे पत्ते आणि नागरिकत्व पडताळण्याची राष्ट्रीय प्रक्रिया असल्याचे सांगत, पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना संधी मिळावी, या उद्देशाने काँग्रेस या प्रक्रियेला विरोध करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजप ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव यांनी पेट्रोलवरील उपकरामुळे दरात तीन टक्क्यांची वाढ, अर्ध्या लिटरमागे आठ रुपये म्हणजेच प्रतिलिटर १६ रुपयांनी वाढलेले दूध दर तसेच तूरडाळ, तांदूळ आणि गव्हासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत ३५ ते ४० टक्क्यांनी झालेली वाढ यावरून सरकारवर टीका केली. महिलांना मोफत बसप्रवासाच्या नावाखाली पुरुषांकडून दुप्पट भाडे वसूल केले जात असल्याचा, तसेच शेतकऱ्यांकडून ट्रान्सफॉर्मर आणि वीजखांबांसाठी लाखो रुपये आकारले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. आगामी निवडणुकीत जनता काँग्रेसला योग्य उत्तर देईल, असे ते म्हणाले.

या आंदोलनात माजी खासदार ईराण्णा कडाडी, माजी आमदार व्ही. आय. पाटील, एम. बी. जिरली, मुरुघेंद्रगौडा पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, उज्ज्वला बडवण्णाचे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: