Belagavi

क्लस्टर किचनला विरोध; अक्षरदासोह कर्मचाऱ्यांचा बेळगाव जिल्हा पंचायतसमोर मोर्चा

Share

क्लस्टर किचन पद्धतीला विरोध आणि किमान वेतनासह विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य अक्षरदासोह कर्मचारी संघटनेतर्फे (सीआयटीयू) बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास बेंगळुरू येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.

जिल्हा पंचायत कार्यालयासमोर जमलेल्या शेकडो शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.

संघटनेचे अध्यक्ष जी. एम. जैनखान यांनी, सातत्यपूर्ण संघर्षामुळे सुरुवातीला मिळणारे ३०० रुपयांचे मानधन वाढले असले, तरी सध्या मिळणारे ४,६०० रुपये कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसे नसल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांना किमान ३१ हजार रुपये वेतन देण्याची मागणी त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या शाळेतच ताजे अन्न तयार करून देणे अपेक्षित असताना, शिक्षण विभाग क्लस्टर किचनच्या नावाखाली शालेय पोषण आहाराचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

शालेय पोषण आहाराची संपूर्ण जबाबदारी स्वयंपाक कर्मचाऱ्यांकडेच सोपवावी आणि शाळांना कुक्कुट महामंडळामार्फतच अंडी पुरवावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली. केंद्र आणि राज्य सरकारांकडून निधीत कपात होत असल्याने लाखो महिलांच्या रोजगारावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास बेंगळुरू येथे जाऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

या आंदोलनात खजिनदार तुळसाम्मा माळदकर, सचिव माशाबी डोलायत यांच्यासह सावित्री चप्परद, सुमन गडाद, अन्नपूर्णा हलमणी, पार्वती कौजलगी, सुनीता चाळण्णवर, देवकी हुकेरी, सविता बाल्यागोळ आणि भारती जोगण्णवर आदी सहभागी झाले होते.

Tags: