goa

मासळी वाहतुकीच्या आडून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Share

मासळी आणि बर्फाच्या ट्रेच्या आडून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करण्याचा प्रयत्न उत्पादन शुल्क विभागाने उधळून लावला. बेळगावजवळील बाची रस्त्यावर केलेल्या कारवाईत ५५ लाख रुपये किमतीचा दारूसाठा आणि वाहन जप्त करण्यात आले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील बाची रस्त्यावरील वैभव हॉटेलजवळ उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. उडुपी येथे नोंदणी असलेल्या ‘ओशन फिशर’ या शीतगृह वाहनातून मासळी आणि बर्फाच्या वाहतुकीचा बनाव करून गोवा बनावटीची दारू मंगळुरूकडे नेली जात होती. गोपनीय माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क उपनिरीक्षक सुनील पाटील आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला. मात्र, पथकाला पाहताच चालक वाहन जागीच सोडून पसार झाला.

वाहनातील मासळीचे ट्रे बाजूला करून तपासणी केली असता, ‘माल्ट व्हिस्की’ असे नमूद असलेल्या ३५० पुठ्ठ्यांच्या पेट्या आढळल्या. त्यामध्ये १८० मिलीच्या ‘बिग बॉस’ ब्रँडीच्या बाटल्या होत्या. जप्त दारूची किंमत ३५.२८ लाख रुपये, तर वाहनाची किंमत २० लाख रुपये असून एकूण ५५.२८ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. बाटल्यांवर उत्पादनस्थळाचा अचूक पत्ता नसल्याने या तस्करीमागील मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास तीव्र करण्यात आला आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ यांनी दिली.

बाहेरच्या राज्यांतून बेकायदेशीररीत्या आणल्या जाणाऱ्या दारूची रासायनिक गुणवत्ता तपासणी झालेली नसते. त्यामुळे स्वस्त दर किंवा ड्युटी फ्री मद्याच्या नावाखाली अशी दारू खरेदी करून सेवन करू नये, असे आवाहन डॉ. मंजुनाथ यांनी केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव परिसरातील सीमाभागात अधिक कडक देखरेख ठेवण्यात येणार असून, नवीन तपासणी नाकेही उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Tags: