Belagavi

ऊस उत्पादकांचे प्रश्न न सुटल्यास हिवाळी अधिवेशनात तीव्र आंदोलन: कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांचा इशारा

Share

ऊस उत्पादकांचे प्रश्न न्याय्य पद्धतीने न सुटल्यास २ डिसेंबरपासून बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकरी नेते कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी दिला आहे.

शुक्रवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी सरकार शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून साखर कारखानदारांच्या मागण्या पुढे रेटत आहे. सरकारने शेतकऱ्यांचे हित जपण्याऐवजी कारखानदारांची बाजू घेणे निषेधार्ह असल्याचे कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी म्हटले.

राज्यात दुष्काळी परिस्थिती कायम असून सुमारे ६२ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल आहे. असे असताना सरकारने शेतकऱ्यांना केवळ अडीच हजार रुपये मदत देऊन अन्याय केला आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति एकर २५ हजार रुपये पीक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, अलीकडच्या शेतकरी आंदोलनांमध्ये चर्चिल्या जाणाऱ्या ‘सूटकेस’ वक्तव्याबाबत विचारले असता, चळवळीतील कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करावे एवढेच सांगत कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले.

Tags: