Chikkodi

२३ नोव्हेंबरपासून ‘जोल्ले ध्वनी ८८.४’ कन्नड एफएम रेडिओचे प्रसारण

Share

सीमाभागातील श्रोत्यांसाठी ‘जोल्ले ध्वनी ८८.४ – सीमाभागाचा आवाज’ या नव्या कन्नड एफएम रेडिओचे उद्घाटन २३ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. माजी मंत्री आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त जोल्ले एज्युकेशन सोसायटीने हा उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती जोल्ले ग्रुपचे उपाध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांनी दिली.

यक्संबा येथील बीरेश्वर संस्थेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चिक्कोडी आणि सीमाभागातील नागरिक प्रामुख्याने मराठी एफएम रेडिओ ऐकतात. या भागासाठी स्वतःचे कन्नड एफएम रेडिओ असावे, या उद्देशाने माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा महिन्यांपासून या प्रकल्पाची तयारी सुरू होती. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून आवश्यक परवानग्याही मिळवण्यात आल्या आहेत.

हा रेडिओ दिवसाचे २४ तास प्रसारित होणार असून, त्यावर शेतीविषयक तज्ज्ञांच्या मुलाखती आणि उपयुक्त माहिती, गृहिणींचे आरोग्य, पाककला व जीवनशैलीविषयक मार्गदर्शन, उद्योजकता, युवक सक्षमीकरण आणि भारतीय संस्कृतीवर आधारित विशेष कार्यक्रम प्रसारित केले जाणार आहेत. यासोबतच दर्जेदार संगीताचाही समावेश असेल.

२३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता एफएम रेडिओ स्टुडिओचे उद्घाटन आणि शशिकला जोल्ले यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त ‘झी कन्नड सारेगमप’ फेम गायक श्रीहर्ष आणि त्यांच्या १४ सदस्यांच्या चमूचा ‘भजन भारत’ हा भक्तिसंगीत व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला नागरिक आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बसवप्रसाद जोल्ले यांनी केले.

यावेळी ज्योतिप्रसाद जोल्ले, बहाद्दूर गुरव, एम. एम. पाटील आणि संतोष पाटील उपस्थित होते.

Tags: