State

महागाई हीच काँग्रेसची सहावी गॅरंटी : विजयेंद्र यांचा हल्लाबोल

Share

काँग्रेस सरकारच्या सातत्याने होणाऱ्या दरवाढीच्या धोरणाविरोधात भाजपने आज बेंगळुरूतील फ्रीडम पार्क येथे जोरदार आंदोलन केले.

काँग्रेसने दिलेल्या पाच गॅरंटीनंतर आता महागाई हीच जनतेसाठी सहावी गॅरंटी ठरली आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केली.

भाजपच्या या धरणे आंदोलनात विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी, खासदार, आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरात वाढ केल्याबद्दल भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला. दरवाढीचा अतिरिक्त आर्थिक भार सर्वसामान्य नागरिकांवर न टाकता राज्य सरकारनेच तो उचलावा, अशी मागणी करण्यात आली. उच्च न्यायालयानेही सरकारला फटकारले असून, नुकसानभरपाईच्या वितरणातही काँग्रेस सरकारकडून गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्यांनी केला.

राज्यात गरीब जनतेवर महागाईमुळे अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे, अशी टीका विजयेंद्र यांनी केली. मुख्यमंत्र्यांना उद्देशून आता तुमचा मनमानी कारभार चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आगामी निवडणुकीत काँग्रेस सरकारला सत्तेतून घरी पाठवण्याचा निर्णय जनतेने घेतला असून, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सत्तेवर आणून काँग्रेसला योग्य उत्तर दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags: