Belagavi

बेळगाव अधिवेशनात सरकारवर पुन्हा दबाव आणणार : चून्नाप्पा पुजारी

Share

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेळगावच्या हिवाळी अधिवेशनात सरकारवर पुन्हा दबाव आणणार असल्याचा इशारा शेतकरी नेते चून्नाप्पा पुजारी यांनी दिला. गुर्लापूर येथे सुरू झालेल्या आंदोलनानंतर उसाला पहिला हप्ता प्रतिटन ३६०० रुपये निश्चित झाल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या १२ ते १३ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला शेतकरी, कन्नड संघटना, माजी सैनिक आणि विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बेळगाव, बागलकोट आणि विजापूरसह राज्यभर उसाला प्रतिटन ३६०० रुपये पहिला हप्ता देण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.

साखरेच्या विक्रीतून कारखान्यांना मिळणाऱ्या अतिरिक्त नफ्यातून शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० ते ८०० रुपये दुसरा हप्ता मिळवून देण्याचा करार झाल्याचे पुजारी यांनी सांगितले. साखरेचा दर प्रतिकिलो ६० ते ७० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

शेतीसाठी दिवसा १२ तास थ्रीफेज वीज द्यावी, तसेच कृष्णा उपसा सिंचन आणि एत्तिनहोळे यांसारखे प्रलंबित सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत, अशी मागणी त्यांनी केली. हिवाळी अधिवेशनात राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारवर दबाव आणणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags: