Belagavi

जमावबंदीचे आदेश झुगारून जेलभरो आंदोलनाचा प्रयत्न

Share

ऊसाला योग्य दर मिळावा आणि प्रतिटन अतिरिक्त एक हजार रुपयांची घोषणा करावी, या मागणीसाठी बेळगावात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला बुधवारी वेगळे वळण मिळाले. शहरात जमावबंदीचे आदेश लागू असतानाही जेलभरो आंदोलनाचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी शेतकरी नेते चूनप्पा पुजारी यांच्यासह शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतले.

जिल्हा प्रशासनाने बेळगाव शहरात बीएनएस कलम १६३ अंतर्गत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करून चूनप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मुक्तिमठ परिसरात जमले होते. जेलभरो आंदोलनाची तयारी सुरू असतानाच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. धक्काबुक्कीमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी चूनप्पा पुजारी यांच्यासह शंभरहून अधिक शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन विविध पोलीस ठाण्यांत तसेच कल्याण मंडपांमध्ये नेले.

पोलिसांच्या ताब्यात असतानाही चूनप्पा पुजारी यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने उसाला योग्य दर जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. ताब्यात घेतले किंवा जमावबंदीचे आदेश लागू केले तरी आंदोलन सुरूच राहील. गरज पडल्यास राज्यभर रास्ता रोको आणि कर्नाटक बंद आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतल्याची बातमी पसरताच जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रास्ता रोको करून निषेध व्यक्त केला.

याबाबत बेळगावचे पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी माध्यमांशी बोलताना शहरातील शांतता आणि सुव्यवस्था राखणे तसेच नागरिकांचे हित जपणे ही पोलिसांची प्राथमिकता असल्याचे सांगितले. राणी चन्नम्मा सर्कलसह शहरातील प्रमुख भागांमध्ये शाळा, महाविद्यालये आणि मोठी रुग्णालये आहेत. परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच आपत्कालीन उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना अडथळा होऊ नये, यासाठी बीएनएस कलम १६३ लागू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शंभरहून अधिक शेतकऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरते ताब्यात घेण्यात आले होते. कोणालाही अधिकृतरीत्या अटक करण्यात आलेली नाही. त्यांना शहराबाहेर सोडल्यानंतर सुरक्षितपणे त्यांच्या गावी पाठवण्यात आल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.

Tags: