Belagavi

बेळगावच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी वेगात

Share

बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला वेग आला असून, निवास, भोजन आणि आवश्यक सुविधांची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी राहुल शिंदे यांनी दिले.

हिवाळी अधिवेशन २०२६ च्या यशस्वी आयोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्या आणि उपसमित्यांची पूर्वतयारी बैठक बुधवारी (४ नोव्हेंबर) जिल्हा पंचायत सभागृहात झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून राहुल शिंदे बोलत होते. सर्व समित्यांनी परस्पर समन्वयाने काम करून अधिवेशन यशस्वी करावे, असे त्यांनी सांगितले.

अधिवेशनासाठी येणारे मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी योग्य निवास तसेच भोजनाची व्यवस्था करावी. यासाठी शहरातील हॉटेलमध्ये खोल्या आरक्षित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

सुवर्ण विधानसौधातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षांमध्ये संगणक व्यवस्था आधीच उपलब्ध करून द्यावी. तसेच सर्व संगणक व्यवस्थित सुरू असल्याची खात्री करावी. सुवर्णसौधात कोणत्याही अडथळ्याशिवाय अखंड इंटरनेट सुविधा उपलब्ध होण्यासाठी संबंधित संस्थांशी आतापासूनच समन्वय साधावा, असे निर्देश त्यांनी दिले.

अधिवेशनासाठी येणारे मान्यवर, अधिकारी, माध्यम प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी आपत्कालीन वैद्यकीय पथके तैनात करावीत. अधिवेशनादरम्यान कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत. सर्व विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे, असे राहुल शिंदे यांनी स्पष्ट केले.

बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंह, काडा प्रशासकीय अधिकारी एस. एस. बिरादार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: