Belagavi

हत्तरगी टोलनाक्यावर शेतकऱ्यांचे जेलभरो; जमावबंदी झुगारून महामार्गावर ठिय्या

Share

उसाला योग्य हमीभाव मिळावा, या मागणीसाठी जमावबंदी आदेश झुगारून शेकडो शेतकऱ्यांनी हत्तरगी टोलनाक्यावर महामार्ग रोखत जेलभरो आंदोलन केले.

उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर जाहीर करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. हे आंदोलन आता बेळगाव शहराच्या दिशेने सरकत आहे. राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करू नये, यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते. मात्र, या आदेशाला न जुमानता शेकडो शेतकरी पायी मोर्चाने हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी टोलनाक्यावर दाखल झाले. महामार्गावरच ठिय्या देत शेतकऱ्यांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी टोलनाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आंदोलनाचे नेतृत्व करणारे चुन्नप्पा पुजारी यांनी सरकारला इशारा देताना, लोकप्रतिनिधींना निवडून सत्तेवर आणणारे शेतकरीच आहेत, याचा सरकारने विसर पडू देऊ नये, असे सांगितले. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चेचा उल्लेख करत सरकारने तातडीने योग्य ऊसदर जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी इच्छाशक्ती दाखविल्यास एका तासात बेळगावला येऊन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेता येऊ शकतो. उद्यापर्यंत योग्य दर जाहीर न केल्यास राज्यभरातील एक कोटींहून अधिक लोक जेलभरो आंदोलनात सहभागी होतील. तसेच आगामी विधिमंडळ अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांना बेळगावात पाय ठेवू देणार नाही आणि अधिवेशनही होऊ देणार नाही, असा इशारा पुजारी यांनी दिला.

Tags: