Belagavi

ऊसदरासाठी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न

Share

ऊसाला योग्य दर जाहीर करावा आणि साखर कारखाने तातडीने सुरू करावेत, या मागणीसाठी बेळगावात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मागण्यांवर निर्णय होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला.

ऊसदराचा निर्णय घेण्यास जिल्हा प्रशासनाकडून विलंब होत असल्याचा आरोप करत शेतकरी आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शेतकरी नेते गणेश इळिगेर आणि सुरेश परगण्णावर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला हिरवे उपरणे बांधून टाळे लावण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, काल रात्री दहा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी आणि साखर कारखानदारांमध्ये दीर्घ बैठक झाली; मात्र त्यातून अंतिम निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतातील ऊस वाळत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे प्रतिटन उसाला किमान चार हजार रुपये दर जाहीर करावा आणि ऊसतोडणी सुरू करण्यासाठी साखर कारखाने तातडीने सुरू करावेत, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली.

जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास राणी चन्नम्मा सर्कल पूर्णपणे बंद करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. सरकार आणि कारखानदारांनी आजच दर जाहीर न केल्यास आगामी काळात जिल्ह्यातील साखर कारखान्यांना घेराव घालून आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शेतकरी नेत्यांनी दिला.

यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की व शाब्दिक वाद झाला. या झटापटीत एक महिला खाली पडून जखमी झाली.

Tags: