मोबाईलच्या वाढत्या वापराच्या काळात मुलांनी कराटेसारख्या क्रीडा प्रकारांत सहभागी होणे त्यांच्या शारीरिक विकासासाठी आणि स्वसंरक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे, असे मत महापौर प्रीती कामकर यांनी व्यक्त केले.

कम्प्लीट कराटे अकादमीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा उपक्रमांनाही महत्त्व दिले पाहिजे, असे सांगून त्यांनी कराटेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करून शुभेच्छा दिल्या.


कराटेमुळे विशेषतः मुलींना आत्मविश्वास आणि स्वसंरक्षणाचे बळ मिळते. खेळाडूंना महापालिकेकडून पूर्ण प्रोत्साहन दिले जाईल. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना महापालिकेतर्फे दीड लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. तसेच क्रीडा क्षेत्रासाठी विशेष निधी राखून ठेवण्याबाबत कौन्सिलच्या बैठकीत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. आपल्या पदावधीच्या अखेरीस ‘महापौर चषक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही महापौर कामकर यांनी दिली.

बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे सचिव आणि कराटे प्रशिक्षक जितेंद्र काकतीकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशामागील मेहनतीची माहिती दिली. कराटेचे प्रशिक्षण घेताना विद्यार्थ्यांना सुरुवातीला पांढरा बेल्ट दिला जातो. त्यानंतर पिवळा, नारिंगी, हिरवा, निळा, जांभळा आणि तपकिरी बेल्टचे टप्पे पार करून ब्लॅक बेल्टपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे पाच वर्षांचा कठोर सराव करावा लागतो. प्रशिक्षण शिबिरे, काता, स्पारिंग, योगासने आणि विविध स्तरांवरील स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना जावे लागते. या प्रवासात पालकांचे त्याग, पाठबळ आणि आर्थिक सहकार्य मोलाचे ठरते. मुलांना शाळेत पाठवण्याबरोबरच ३६ हून अधिक क्रीडा उपक्रमांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी बेल्ट परीक्षेत सहभाग घेतला. पाच वर्षांच्या सातत्यपूर्ण सरावानंतर आठ विद्यार्थ्यांनी ब्लॅक बेल्ट प्राप्त केला. यामध्ये गौरवी मेदार, सृष्टी पाटील, संदीप अंगडी, अमर शानभाग, श्रीरक्षा नायक, विनय आर. नायक आणि प्रणव उगार यांच्यासह आठ विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या विद्यार्थ्यांना ‘शोटोकान इंडिया’चे अध्यक्ष भार्गव रेड्डी, जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे सचिव जितेंद्र काकतीकर, अक्षय परमोजी आणि भूषण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला इंडियन बॉडीबिल्डिंग फेडरेशनचे संघटन सचिव अनिल अंबरोळे आणि विनायक कामकर उपस्थित होते.


Recent Comments