उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दराच्या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानाला घेराव घातला. उद्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

उसाला प्रतिटन ५,५०० रुपये रोख बिल आणि एसआयपीच्या माध्यमातून अतिरिक्त एक हजार रुपये द्यावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सकाळपासून साखर संस्थेचे कार्यालय बंद पाडून आंदोलन सुरू केले होते. रास्ता रोको, जेलभरो आणि राष्ट्रीय महामार्ग रोखूनही सरकार व जिल्हा प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पायी मोर्चाने मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानाकडे धाव घेत घेराव घालून धरणे धरले.

गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने आंदोलन करूनही उसाच्या थकीत बिलाबाबत सरकारने कोणतीही ठोस घोषणा केलेली नाही, अशी नाराजी शेतकरी नेत्यांनी व्यक्त केली. सरकारच्या गॅरंटी योजनांचे स्वागत करतानाच शेतकऱ्यांसाठी ‘सहावी गॅरंटी’ म्हणून उसाला योग्य दर देण्याची योजना लागू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. उसाच्या दराबाबत विविध शेतकरी संघटनांकडून वेगवेगळ्या मागण्या मांडल्या जात असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी संघटनांनी एकत्रितपणे आपली भूमिका मांडणे आवश्यक आहे. यासाठी उद्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी नेते आणि साखर कारखान्यांच्या अध्यक्षांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर शेतकरी नेते गणेश आणि अन्य नेत्यांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले. मात्र, उद्याच्या बैठकीत उसाच्या दराबाबत समाधानकारक निर्णय न झाल्यास मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या निवासस्थानांना घेराव घालून आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला.


Recent Comments