Belagavi

स्वयंपूर्ण गावांतूनच विकसित भारताचे स्वप्न साकार होईल : महांतेश कवटगीमठ

Share

स्वयंपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम गावांच्या उभारणीतूनच विकसित भारताचे स्वप्न साकार होऊ शकते, असे प्रतिपादन कर्नाटक विधान परिषदेचे माजी मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ यांनी केले. केएलई तंत्रज्ञान विद्यापीठाच्या शेषगिरी कॅम्पसमध्ये आयोजित ‘स्मार्ट व्हिलेज संकल्पना आणि शाश्वत ग्रामीण विकास’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

प्रकृती ग्रुप आणि बेळगाव येथील केएलई तंत्रज्ञान विद्यापीठाच्या शेषगिरी कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील ११५ प्रतिनिधींसह भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो, द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट आणि राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेतील तज्ज्ञांनी परिषदेत सहभाग घेतला.

महांतेश कवटगीमठ म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामपंचायत ही देशाच्या विकासाची मूलभूत शक्ती असून, ग्रामपंचायत अध्यक्ष गावाच्या विकासाचे नेतृत्व करणारे प्रमुख घटक आहेत. मात्र, सध्या कर्नाटकात ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका झालेल्या नाहीत. लवकरात लवकर निवडणुका झाल्यास सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावांमध्ये शौचालयांची उभारणी आणि त्यांची देखभाल, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सामाजिक वनीकरण, सेंद्रिय शेती, ग्रंथालये तसेच ई-लायब्ररी यांसारख्या उपक्रमांवर ग्रामपंचायतींनी विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवून गावांमध्ये स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले, तेव्हा या उपक्रमावर विरोधकांनी टीका केली होती. मात्र, देश स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, या भूमिकेतून अभियानाला प्राधान्य देण्यात आले. ग्रामीण भागातील महिला आणि मुलींना शौचासाठी पहाटे किंवा सूर्यास्तानंतर बाहेर जावे लागत असल्याची परिस्थिती बदलण्यासाठी शौचालयांची उभारणी महत्त्वाची ठरली. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामपंचायतींना शौचालय उभारणीसाठी विशेष निधी देण्यात आला. पाण्याची पुरेशी उपलब्धता आणि योग्य देखभाल असेल तरच या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते, असे कवटगीमठ यांनी नमूद केले.

पाण्याचे योग्य व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे, याबाबत त्यांनी जॉर्डनमधील अनुभव सांगितला. दहा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या एका पथकासह इस्रायलला जाताना जॉर्डनमध्ये मुक्काम केला असता, तेथे चार वर्षांतून एकदाच पाऊस पडतो आणि त्या पावसाच्या पाण्याचा पुढील चार वर्षे वापर केला जातो, अशी माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापरही केला जातो. त्यामुळे प्रत्येक थेंबाचा काटकसरीने वापर, घरगुती पावसाच्या पाण्याचे संकलन आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी शोषखड्ड्यांची निर्मिती यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.

विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. गाव, शहर किंवा नगरपरिसरात झाडे तोडण्यास परवानगी देताना संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने निर्णय घ्यावा. तसेच पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिवापर केल्याने मानवी आरोग्याबरोबरच जमिनीची सुपीकताही धोक्यात येते. त्यामुळे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याचा पुनर्वापर, सौरऊर्जा, अक्षय ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करून गावांचा शाश्वत विकास साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

केएलई तंत्रज्ञान विद्यापीठाच्या शेषगिरी कॅम्पसचे प्राचार्य डॉ. एस. एफ. पाटील यांनी स्वागत केले. शाश्वत जीवनशैलीला चालना देण्यासाठी निसर्गाधारित उपाययोजना आणि आधुनिक तंत्रज्ञान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. शाश्वत ग्रामीण परिवर्तनासाठी शैक्षणिक संस्था, शेतकरी, अभियंते, स्थानिक समुदाय आणि धोरणकर्ते यांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रकृती ग्रुपचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुरंदर बेकल यांनी परिषदेचा उद्देश स्पष्ट केला. पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण गावांची उभारणी करण्यासाठी ‘इको-स्मार्ट व्हिलेज’ संकल्पनेवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शेतीची उत्पादकता, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि ग्रामीण भागाची प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याची क्षमता वाढविण्यासाठी पारंपरिक ज्ञान, तांत्रिक नवकल्पना आणि डिजिटल परिवर्तन यांची सांगड घालण्याचे आवाहन त्यांनी केले.

विशाखापट्टणम येथील फेडरेशन ऑफ मायनर मिनरल इंडस्ट्रीजचे महासचिव आणि प्रमुख पाहुणे डॉ. सी. एच. राव यांनी गावांना आर्थिक विकासाची उत्पादक केंद्रे बनविण्याबाबत विचार मांडले. कृषी कचरा, सेंद्रिय कचरा, पाणी आणि ऊर्जेचा पुनर्वापर करणाऱ्या चक्रीय शेती पद्धतींचा अवलंब करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कृषी कचऱ्यापासून कंपोस्ट, जैविक खत आणि बायोगॅस निर्मिती केल्यास जमिनीचे आरोग्य सुधारण्याबरोबरच शेतीचा उत्पादन खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.

डॉ. पुरंदर बेकल लिखित आणि डॉ. प्रभाकर संगूरमठ सहलेखित ‘Sustainable Mine Water Management – Integrated Hydrological Perspective’ या पुस्तकाचे प्रकाशन परिषदेत करण्यात आले. हटी गोल्ड माइन्सचे माजी संचालक डॉ. प्रभाकर संगूरमठ यांनी पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी भूजल जलविज्ञान, वैज्ञानिक पद्धतीने खाणक्षेत्रातील पाण्याचे व्यवस्थापन आणि पर्यावरण पुनर्स्थापनेचे महत्त्व स्पष्ट केले. शाश्वत ग्रामीण विकासासाठी वैज्ञानिक संशोधन, तांत्रिक नवकल्पना आणि संसाधनांचे जबाबदार व्यवस्थापन यांमध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. नयना एच. आणि कु. श्रेया खोत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सिव्हिल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. एम. मंजुनाथ यांनी आभार मानले.

Tags: