Vijayapura

विजापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक; महामार्ग रोखत शेतकऱ्यांचे आंदोलन

Share

उसाला योग्य दर निश्चित करण्यासाठी आणि कर्नाटक बंदला पाठिंबा दर्शवत विजापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून तीव्र आंदोलन छेडले.

विजापूर शहराच्या बाहेरील टोल नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्ग रोखून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. या वेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. मात्र, शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. दुसरीकडे, बबलेश्वर शहरातील शांतवीर चौक येथे शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत धारवाड-विजापूर राज्य महामार्ग रोखला आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मुदेबिहाळ आणि निडगुंदी येथेही बंदचा मोठा परिणाम दिसून आला.

उसाच्या आधारभूत किमतीत वाढ करावी आणि राज्य सरकारने ‘एसएपी’अंतर्गत प्रतिटन १,००० रुपये अनुदान द्यावे, या मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे. महामार्ग रोखल्यामुळे दोन्ही बाजूंना मालवाहतूक ट्रक, बस आणि खाजगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.

उसाला योग्य भाव आणि अनुदान मिळावे यासाठी विजापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. आता तरी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन हा प्रश्न सोडवणार की आंदोलन आणखी तीव्र होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

विजयकुमार सारवाड
इन न्यूज
विजापूर

Tags: