बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी विक्रेत्यांकडून वजनात फसवणूक, दलालांकडून अधिक कमिशनची आकारणी आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले. उपलोकायुक्त न्यायमूर्ती बी. वीरप्पा यांनी बाजार समितीला भेट देऊन पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

बाजार समितीतील भाजी विक्रेत्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करताना वजनात फसवणूक होत असल्याचे तसेच दलालांकडून अधिक कमिशन घेतले जात असल्याचे प्रकार समोर आले. घाऊक भाजी विक्रेते विक्रीच्या पावत्या देत नसल्याचे आढळल्याने वीरप्पा यांनी नाराजी व्यक्त केली.


बाजार समितीतील शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प बंद असल्याचे आणि उपाहारगृहात अस्वच्छता असल्याचे आढळले. उपाहारगृहाची अवस्था कचराकुंडीसारखी झाल्याबद्दल त्यांनी सचिवांना जाब विचारला. तसेच शेतकरी आणि हमालांसाठी विश्रांतीगृह व वाहनतळाची व्यवस्था नसल्याबाबत माहिती घेतली.

बाजार समितीतील हमालांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत त्यांनी कामगार विभागाला दोन दिवसांत सर्व दुकानांतील कामगारांची माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले. तसेच पात्र कामगारांना मिळणाऱ्या शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितले. बाजार समितीतील स्वच्छतागृहांची पाहणी केल्यानंतर त्यांनी शेतकरी भवनालाही भेट देऊन तेथील व्यवस्थेची माहिती घेतली.
यावेळी उपनिबंधक अरविंद, लोकायुक्त पोलीस अधीक्षक प्रसन्न देसाई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव के. एन. शिवकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनाकेरी, उपविभागीय अधिकारी श्रवण नायक, महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments