Belagavi

बेळगावात रिक्षाचालकांचा भव्य मोर्चा; अनधिकृत बाइक टॅक्सी बंद करण्याची मागणी

Share

बेळगावात अनधिकृत बाइक टॅक्सी आणि नियमबाह्य इलेक्ट्रिक रिक्षा सेवा बंद करण्याच्या मागणीसाठी रिक्षाचालक संघटनांनी भव्य मोर्चा काढला. राणी चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या मोर्चानंतर चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. योग्य कारवाई न झाल्यास ११ नोव्हेंबरला संपूर्ण जिल्ह्यात रिक्षा बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला.

बेळगाव शहरात अधिकृत परवानगीशिवाय सुरू असलेल्या रॅपिडो, ओला आणि उबरच्या बाइक टॅक्सी तसेच नियमबाह्य इलेक्ट्रिक रिक्षांवर कारवाई करावी, अशी मागणी चालकांनी केली. अनधिकृत वाहनांमुळे गरीब रिक्षाचालकांच्या रोजगारावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

रिक्षाचालक संघटनेचे सल्लागार सुरेश रिजकन्नवर यांनी, पांढऱ्या नंबरप्लेटच्या दुचाकी बाइक टॅक्सी म्हणून वापरण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली नसतानाही आरटीओ आणि पोलीस विभाग कारवाई करत नसल्याचा आरोप केला.

गेल्या सहा महिन्यांपासून रिक्षाचालकांच्या समस्यांबाबत आरटीओ किंवा पोलीस विभागाने बैठक घेतलेली नाही. परिवहन मंत्र्यांचे मौन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे हा प्रकार सुरू असल्याचा आरोप रिजकन्नवर यांनी केला. नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यास आमचा विरोध नाही; मात्र सर्व रिक्षाचालकांना दोषी समजू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ऑटो ओनर्स अँड ड्रायव्हर्स असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार अॅड. अख्तर पटेल यांनी सांगितले की, कर्ज काढून रिक्षा खरेदी करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब चालकांना ॲपआधारित अनधिकृत सेवांचा मोठा फटका बसत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने देऊनही उपयोग झालेला नाही. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास ११ नोव्हेंबरला संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात रिक्षा सेवा बंद करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

या मोर्चात मोठ्या संख्येने रिक्षाचालक सहभागी झाले होते.

Tags: