दारूच्या नशेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच तिचा निघृण खून केल्याची धक्कादायक घटना बेळगाव शहरातील हनुमान नगर येथे घडली आहे.

धारवाड जिल्ह्यातील चिक्कमल्लीगवाड येथील अश्विनी हेगडे असे मृत महिलेचे नाव असून, हत्या प्रकरणी तिचा पती विठ्ठल हेगडे याला पोलिसांनी अटक केली आहे. दसऱ्याच्या तोंडावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दोन चिमुकल्या मुलांचे आईचे छत्र हरपले आहे.

धारवाड जिल्ह्यातील चिक्कमल्लीगवाड येथील अश्विनी आणि बैलहोंगल तालुक्यातील विठ्ठल हेगडे यांचा विवाह सुमारे दहा वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर हे दाम्पत्य उदरनिर्वाहासाठी बेळगाव शहरात येऊन स्थायिक झाले होते. मजुरी करून संसार चालवणाऱ्या या दांपत्याला दोन मुले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. पती विठ्ठल हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांचे वाद विकोपाला गेले होते. दसऱ्याच्या सणानिमित्त अश्विनी आपल्या माहेरी गेली होती. मात्र आजारी असलेल्या सासऱ्यांना जेवण देण्यासाठी ती घरी आली असता ही दुर्दैवी घटना घडली.
घरी आलेल्या अश्विनीशी दारूच्या नशेत धुंद असलेल्या विठ्ठलने पुन्हा वाद घातला. हा वाद विकोपाला गेला आणि संतप्त झालेल्या विठ्ठलने तिच्यावर प्राणघातक हल्ला करून तिची हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि संशयित आरोपी विठ्ठल हेगडे याला ताब्यात घेतले. दहा वर्षांच्या संसारानंतर घडलेल्या या थरारामुळे दोन चिमुकली मुले उद्ध्वस्त झाली असून, याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments