बेळगाव येथील बॉक्साईट रोडवरील उषा कॉलनीतील श्री महालक्ष्मी मंदिरात १६ व्या नवरात्रोत्सवाचे आयोजन भक्तिमय वातावरणात करण्यात आले आहे.

श्री महालक्ष्मी मंदिर विकास समितीतर्फे आयोजित हा उत्सव ११ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरदरम्यान रंगणार आहे. पहिल्या दिवशी महाअभिषेक, गणहोम, चंडिका होम आणि घटस्थापना पार पडली. दररोज दुपारी चंडिका होम आणि महाआरतीचे आयोजन करण्यात येत आहे.

१९ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता विशेष कन्निका पूजा होणार असून कारंजी मठाचे श्री गुरुसिद्ध महास्वामीजी उपस्थित राहणार आहेत. २१ ऑक्टोबरला सायंकाळी चंडिका होम पूर्णाहूती, शमी पूजा व सीमोल्लंघन सोहळा पार पडणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाईल.
हा सोहळा मुरगोडचे श्री नीलकंठ महास्वामीजी आणि हुक्केरी मठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांच्या सानिध्यात पार पडणार आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष देवी हिरेमठ, खजिनदार सतीश माळवदे, प्रकाश हेगडे आणि नागेश पाटील यांनी केले आहे.



Recent Comments