बेळगावमध्ये २५ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘सशक्त कर्नाटक रन’ मॅरेथॉनचे भव्य आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
सुवर्ण विधानसौधपासून सुरू होणाऱ्या या क्रीडा महोत्सवात तीन विभागांत तीन हजारांहून अधिक स्पर्धादूक सहभागी होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारच्या ‘सशक्त कर्नाटक’ कार्यक्रमांतर्गत युवा सबलीकरण व क्रीडा विभाग आणि ‘जेजे ॲक्टिव्ह’ संस्थेच्या सहकार्याने बेळगाव जिल्ह्यात प्रथमच या महामॅरेथॉनचे आयोजन होत आहे. आगामी २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या या स्पर्धेत ५ किमी, १० किमी आणि २१ किमी (हाफ मॅरेथॉन) असे तीन प्रमुख विभाग असणार असून सर्व शर्यती सुवर्ण विधानसौध येथूनच झेंडा दाखवून विविध मार्गांनी मार्गस्थ होतील.
सध्या बेळगावमध्ये रनिंग कल्चर वेगाने रुजत असून नागरिकांमध्ये सक्रिय जीवनशैली रुजविणे आणि समाजात सलोखा वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या मॅरेथॉनमध्ये स्थानिक रनिंग क्लब आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील धावपटू सहभागी होण्याची शक्यता असून, या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त, वैद्यकीय सुविधा आणि हयड्रेशन पॉईंट्सची जय्यत तयारी करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments