२४ तास ‘निरंतर ज्योती’ योजनेअंतर्गत अखंड आणि सुरळीत वीज पुरवठा मिळावा, या रास्त मागणीसाठी हंचिनाळ येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उपोषणकर्ते नागेश चौगुले यांची प्रकृती अचानक खालावली.
उपोषणादरम्यान त्यांची तब्येत बिघडल्याने आंदोलनस्थळी चिंतेचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीनंतर, चौगुले यांना तातडीने १०८ ॲम्ब्युलन्सद्वारे निप्पाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणस्थळी ग्रामस्थांचा रोष उफाळून आला असून, सुमारे १०० हून अधिक नागरिक आणि शेतकरी २४ तास या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. लोकप्रतिनिधी आणि महावितरणचे अधिकारी केवळ तोंडी आश्वासने देत असून, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. सण-उत्सव आणि शेतीच्या कामांच्या दिवसांतच विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने हंचिनाळ येथील नागरिक अत्यंत संतप्त झाले आहेत.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडल्यामुळे आंदोलकांमध्ये चिंतेसोबतच तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘प्रशासनाने आंदोलकांच्या जीवाशी खेळणे तातडीने थांबवावे आणि अजिबात विलंब न करता २४ तास निरंतर ज्योती वीज योजना लागू करावी,’ अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वेळेत योग्य निर्णय न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि उद्भवणाऱ्या संपूर्ण परिणामांची जबाबदारी वीज वितरण कंपनी आणि प्रशासनाचीच असेल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.


Recent Comments