बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (बीसीसी) बँकेत नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याच्या आणि माजी खासदार व बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या नावाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून उपतहसीलदार अरुण श्रीखंडे यांच्याविरुद्ध निपाणी तालुका भाजप व जोल्ले समर्थकांच्या वतीने भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा वर्तुळापासून सुरू झालेला हा मोर्चा जुना पी. बी. रस्ता आणि नगरपरिषद कार्यालयामार्गे तहसील कार्यालयावर धडकली. या वेळी आंदोलकांनी उपतहसीलदार श्रीखंडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलनाला संबोधित करताना भाजप कार्यकर्ते बंडा घोरपडे यांनी सांगितले की, अरुण श्रीखंडे यांनी बीसीसी बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली आहे. अण्णासाहेब जोल्ले यांच्याशी निकटचे संबंध असल्याचे सांगून त्यांच्या नावाचा गैरवापर करत ही आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी श्रीखंडे यांची चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली.
यानंतर निपाणीचे तहसीलदार सुरेश मुंजे यांना निवेदन सादर करून दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली. भाजप नेते श्रीकांत बन्ने आणि दादा राजे सरकार यांनीही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली. या वेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments