महांतेश नगर येथील एमिनेंट कोचिंग क्लासेसमध्ये जागतिक शिक्षक दिन व शिक्षक सत्कार सोहळा पार पडला. शिक्षकांनी दिलेला ज्ञानाचा दिवा पिढ्यानपिढ्या तेवत राहतो, असे प्रतिपादन निडसोसी सिद्धसंस्थान मठाचे डॉ. शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी केले.

शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दिशादर्शक ठरून प्रगतीचा पाया रचते, असे सांगत डॉ. शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले.

देशाच्या सुरक्षेत आणि वाढत्या संरक्षण क्षेत्रात युवाशक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिस्त, देशभक्ती आणि सेवाभावी वृत्ती जोपासून विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात आपले भविष्य घडवावे, असे आवाहन खासदार जगदीश शेट्टर यांनी केले. सैनिकी शाळा, नवोदय व कित्तूर शाळांसारख्या संस्थांच्या प्रवेश परीक्षांसाठी एमिनेंट कोचिंग क्लास करत असलेले कार्य मोलाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्पर्धात्मक युगात केवळ गुणांपेक्षा विषयाचे ज्ञान, शिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे असतात. भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी बालपणापासूनच पाया मजबूत करणे आवश्यक आहे, असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मंजुनाथ कौलगी यांनी मांडले. आगामी काळात स्वतःची शाळा सुरू करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

मुरुगेंद्रगौडा पाटील यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचे कौतुक केले. डॉ. नागराज काले यांनी शिक्षणासोबत विद्यार्थ्यांवर संस्कार व मानवी मूल्यांची रुजवणूक करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कॉम्प्युटर विभागप्रमुख डॉ. ज्योती पाटील यांनी फाउंडेशन कोर्सेसच्या महत्त्वावर प्रकाश टाकला, तर संस्थापक सचिव भागलक्ष्मी कौलगी यांनी निवासी शाळेच्या आगामी योजनेबाबत माहिती दिली.

यावेळी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळवून देणाऱ्या शिक्षकांचा व संस्थेतील कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सदानंद बड्डूर यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. रूपा पाटील, नेत्रा होळी, वाणीश्री देवूर, कविता बोम्मन्नवर व अक्षता महाजन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.
Belagavi
शिक्षक अंतर्मनातील ज्ञान बाहेर आणणारी शक्ती: जगद्गुरू श्री डॉ. पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी


Recent Comments