बेळगाव महानगरपालिकेत महाजन अहवाल अंतिम असल्याचे मानणारा ठराव मंजूर झाल्याने कन्नड संघटनांकडून पोकळ उत्सव साजरा करण्यात येत असून आता कन्नड संघटनांची नवी कुरघोडी सुरु झाली आहे. महापौर – उपमहापौरांनी मर्यादांचे उल्लंघन केल्याचा आरोप
करत उभयतांना पदावरून हटविण्याची मागणी कन्नड संघटनानी केली आहे.

मनपा सभेत महापौर आणि उपमहापौर यांनी आपल्या मर्यादांचे उल्लंघन करत नामनिर्देशित सदस्यांशी वाद घातल्याचा आरोप करत त्यांच्या वर्तनावर आक्षेप घेत त्यांना पदावरून हटवण्यासाठी कन्नड संघटनांनी सरकारला १५ दिवसांची मुदत दिली आहे.

कन्नड क्रियाशील समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे २५ हून अधिक कन्नड संघटनांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर ३० सप्टेंबर रोजी महापालिकेत हा ठराव संमत करण्यात आला. २००५ मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याबाबत मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर म्हणून हा ठराव आणल्याचे चंदरगी यांनी सांगितले.
दरम्यान, महापालिकेच्या बैठकीत महापौर आणि उपमहापौर यांनी आपल्या मर्यादांचे उल्लंघन करत नामनिर्देशित सदस्यांशी वाद घातल्याचा आरोप चंदरगी यांनी केला. निरीक्षकांच्या नियुक्तीला विरोध करत सरकारच्या भूमिकेविरुद्ध जाणाऱ्या महापौर व उपमहापौरांवर राज्य सरकारने कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. येत्या १५ दिवसांत त्यांना न हटवल्यास महापालिका बरखास्त करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.


Recent Comments