बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे गणेश विसर्जनादरम्यान एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्थानिक प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि सुरक्षेच्या अभावामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या घटनेबाबत मच्छे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. मच्छे येथील मुख्य तलावात गणेश विसर्जन करताना विश्वेश विनोद नाईक या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर ग्रामस्थ आणि गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. विसर्जनस्थळी आपत्कालीन बचाव पथक किंवा आवश्यक खबरदारी न घेतल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची सोय करण्यात आली होती. मात्र, या वेळी कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्याने मुख्य तलावातच सर्व मूर्तींचे विसर्जन करावे लागले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. विसर्जनस्थळी अग्निशामक दल, पोहणारे आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले.
मृत विश्वेश विनोद नाईक यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. घरातील कर्त्या तरुणाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे शासकीय नियमांनुसार पीडित कुटुंबाला तात्काळ योग्य आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


Recent Comments