Belagavi

भाजपाकडून बेळगावमध्ये राज्य सरकारविरोधात निदर्शने

Share

बेळगावमध्ये राज्य सरकारच्या धोरणांविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने केली. सरकारच्या आर्थिक नियोजनावर आणि प्रशासकीय कारभारावर यावेळी भाजप नेत्यांनी टीका केली.

कर्नाटक सरकार आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले असून विकासकामांसाठी निधीची कमतरता भासत असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले. सरकारकडून शेतकरी, महिला आणि तरुणांच्या हिताकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला.

कर्नाटकातील सरकार केवळ आश्वासने देत असून कंत्राटदारांची ३८ हजार कोटी रुपयांची बिले थकीत आहेत, असे भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके आणि माजी आमदार संजय पाटील यांनी म्हटले.

राज्याची तिजोरी रिकामी झाली असून दसरा सणात जाहीर केलेले बक्षीस अद्याप देण्यात आले नाही, असे भाजपचे ग्रामीण अध्यक्ष सुभाष पाटील यांनी म्हटले. शेतकऱ्यांना प्रति एकर ५० हजार रुपयांची भरपाई मिळावी आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

राज्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असून सरकार कर्जबाजारी झाले आहे, असे मुरगेंद्रगौडा पाटील आणि धनंजय जाधव यांनी म्हटले.

या निदर्शनांमध्ये शहर अध्यक्ष गीता सुतार, माजी आमदार महांतेश कवटगीमठ, रवी पाटील, किरण जाधव, डॉ. सोनाली सरनोबत आणि उज्ज्वला बडवण्णाचे यांच्यासह भाजप पदाधिकारी सहभागी झाले होते.

Tags: