Belagavi

मुरगोडमधील सरकारी जमिनीवरील बेकायदेशीर खाणकामाविरोधात माजी आमदार आक्रमक

Share

सवदत्ती तालुक्यातील मुरगोड येथे तब्बल शंभर एकर सरकारी जमिनीवर बेकायदेशीर खाणकाम करणाऱ्यांवर आणि त्यांना पाठबळ देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार डॉ. व्ही. आय. पाटील यांनी केली आहे.

सोमवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. व्ही. आय. पाटील बोलत होते. मुरगोड गावाच्या हद्दीतील सरकारी जमिनीवरील निलगिरीची झाडे तोडून वाहून नेली जात असून दगड, माती आणि मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. जुलै २०२४ मध्ये तहसीलदार आणि पोलिसांकडे तक्रार करून अधिकाऱ्यांनी पाहणी केली तरीही अजून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

जेडीएसचे जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी यांनी मुरगोडमधील सर्व्हे नंबर ६१३ मधील ४६ एकर आणि सर्व्हे नंबर ८५५ मधील ११ एकर सरकारी जमिनीवर हे बेकायदेशीर उद्योग सुरू असल्याचे सांगितले. निलगिरीची झाडे आणि दगड-मुरुम लॅपटॉप व जीपीएस फोटोंसह पुराव्यानिशी सादर करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दररोज शेकडो गाड्यांमधून ही खनिज संपत्ती बैलहोंगल आणि आसपासच्या भागात बेकायदेशीरपणे वाहून नेली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच हलकी गावाजवळील एम-सँड युनिट्सभोवती आणि रामापूर रस्त्यावरील गायरान जमिनीवरही बेकायदेशीर खाणकाम सुरू असून यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

Tags: