भाजपला मुस्लिम कधीही विरोधी नसून केवळ दहशतवादीच आपले विरोधी आहेत, असे प्रतिपादन आमदार रमेश जारकीहोळी यांनी केले आहे.


गोकाक येथे सेवा संकल्प उपक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार रमेश जारकीहोळी यांनी रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. याप्रसंगी अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, महिला पदाधिकारी आणि पालकांचा सत्कार करण्यात आला, तसेच अंगणवाडी बालकांना खाऊ व खेळण्यांचे वाटप करण्यात आले.


भारतीय जनता पक्षात एका सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होण्याची संधी मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असे रमेश जारकीहोळी यांनी सांगितले. एका प्रामाणिक कार्यकर्त्याला देशाचे पंतप्रधान पदापर्यंत पोहोचवण्याचे काम भाजप पक्षाने केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदींचे कार्य आणि लोकप्रियता सहन न झाल्याने विरोधी पक्ष त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी अपप्रचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

दहशतवाद्यांना कोणतीही जात किंवा धर्म नसतो आणि भाजप सरकार दहशतवाद्यांचा बिमोड करण्याचे काम करत आहे, असे त्यांनी नमूद केले. विरोधक भाजपला मुस्लिमांचे विरोधी म्हणून दाखवण्याचा खोटा प्रचार करत आहेत, अशा अपप्रचाराला बळी न पडता पक्षाचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवून भाजप अधिक मजबूत करावा, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला आमदारांचे वैयक्तिक सहाय्यक सुरेश सनदी, शहर घटक अध्यक्ष भीमशी भरम्मनवर, महिला जिल्हा अध्यक्षा नैना बस्मे, शहर मंडळ अध्यक्षा गीता जर्तारकर, राजेश्वरी वडेयर यांच्यासह महिला भाजप कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


Recent Comments