बेळगावात १२ दिवस मोठ्या उत्साहात साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवाची सलग ३० तासांहून अधिक काळ चाललेल्या विसर्जन मिरवणुकीने सांगता झाली.

बेळगाव शहरात १२ दिवस चाललेल्या गणेशोत्सवानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. हुतात्मा चौकात उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ, दक्षिण चे आमदार अभय पाटील, महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी, माजी आमदार अनिल बेनके, महांतेश कवटगीमठ, महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. आणि शहर पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनीही मिरवणुकीत सहभाग घेतला.

माळी गल्ली मंडळाच्या गणेश मूर्तीचे पहिले विसर्जन करून मिरवणुकीला अधिकृत सुरुवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौकात गणेश मूर्तीची महाआरती करण्यात आली.

मिरवणुकीच्या मार्गावर ढोल-ताशा, झांज पथक आणि पारंपारिक वाद्यांचा गजर पाहायला मिळाला, तर तरुणांनी वाद्यांच्या तालावर ठेका धरला. हुतात्मा चौकातून सुरू झालेली ही मिरवणूक किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, हेमु कलानी चौक आणि कपिलेश्वर उड्डाणपुलावरून कपिलेश्वर मंदिर परिसरात पोहोचली.

महानगरपालिकेकडून शहरात ८ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती, तर पोलिस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व प्रशासनिक विभागांच्या समन्वयाने विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.




Recent Comments