Belagavi

दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारवर दबाव आणणार

Share

विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी बेळगाव दौऱ्यावर आलेले गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारवर सातत्याने दबाव आणला जात असून पंतप्रधानांच्या भेटीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील गंभीर दुष्काळ परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यातील मदतनिधी वितरीत करण्यात आला असून ही अंतिम मदत नाही. राज्यात १८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले असून एनडीआरएफ नियमांनुसार ३,५०० कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. आगामी काळात आणखी तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून केंद्राकडे पुढील प्रस्तावांची शिफारस केली जाईल.

केंद्राच्या भूमिकेवर आणि एनडीआरएफच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्याबाबत आतापर्यंत १० ते १५ पत्रे लिहिण्यात आली आहेत. अधिक निधी द्यावा लागेल या कारणाने केंद्र सरकार नियमांमध्ये बदल करत नसल्याची शंका व्यक्त करत बाधितांना तत्काळ मदत मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. तसेच अहिंदा नेत्यांना एकत्र आणण्याच्या के. एन. राजन्ना यांच्या प्रयत्नांवर बोलताना, याविषयी आपल्याकडे कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Tags: