यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने खानापूर तालुक्यातील खरीप पिके करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, यासाठी यावर्षी खानापूर तालुक्याला कर्नाटक सरकारने दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत जाहीर करावी, या आशा मागणीचे निवेदन शुक्रवार दि.२५ सप्टेंबर रोजी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर तहसीलदारांना देण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे की, खानापूर तालुक्यातील भूजल पातळी आणि जमिनीतील ओलावा यांसारख्या निकषांवरून या भागात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत आहे. तातडीने प्रशासकीय हस्तक्षेप न झाल्यास खानापूर तालुक्यातील ग्रामीण शेतकरी व कष्टकरी कुटुंबांवर मोठे आर्थिक आणि मानवी संकट ओढवण्याची शक्यता आहे.
खानापूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये पिकांच्या नुकसानीचे आणि पावसाच्या कमतरतेचे मूल्यांकन करण्यासाठी तातडीने प्रत्यक्ष शेत पाहणी व दूरसंवेदन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्वेक्षण करण्यात यावे.

आवश्यक मूल्यांकन अहवाल आणि आकडेवारीच्या आधारे खानापूर तालुका अधिकृतपणे दुष्काळग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी.

राज्य शासनाकडे अधिकृत प्रस्ताव पाठवून तातडीने मदतनिधी उपलब्ध करून देण्यात यावा.
यासाठी शेतकऱ्यांचे आपत्कालीन कृषी कर्ज माफ करण्यात यावे,येणाऱ्या ७ ते ८ महिन्यांचे संरक्षण करण्यासाठी सतत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यास तातडीच्या उपाययोजना कराव्यात आणि जनावरांसाठी छावण्या उभारण्यात याव्यात. खानापूरचे नागरिक आणि शेतकरी संकटाच्या या काळात त्वरित कारवाईसाठी प्रशासनाकडे आशेने पाहत आहेत. राज्य सरकारची मदत बाधितांपर्यंत कोणत्याही विलंबाशिवाय पोहोचावी यासाठी आपल्याकडून जलद आणि संवेदनशील हस्तक्षेप व्हावा, आशा अशयाचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष गोपाळराव देसाई,माजी आमदार दिगंबरराव पाटील,कार्याध्यक्ष व पी एल डी बॅकेचे चेएरमन मुरलीधर पाटील,सरचिटणीस आबासाहेब दळवी,गोपाळराव पाटील,मारुती परमेकर,पांडुरंग सावंत,प्रकाश चव्हाण,संजीव पाटील,धनंजय पाटील,राजाराम देसाई,पुंडलिक पाटील,बाळाराम शेलार, रामचंद्र गावकर,रुक्माना झुंजवाडकर,राजेंद्र कुलम,म्हात्रु धबाले,मारुती गुरव आदी उपस्थित होते.


Recent Comments