Khanapur

“जांबोटी-वडगाव भागातील नेटवर्क समस्येबाबत बीएसएनएला निवेदन”

Share

खानापूर तालुक्यातील जांबोटी-वडगाव गावात कोणत्याही नेटवर्क कंपनीची समाधानकारक इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना विविध ऑनलाइन कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वडगांव ग्रामस्थांच्या वतीने बीएसएनएलचे डेप्युटी जनरल मॅनेजर. श्री.देवेंद्र आणि असिस्टंट जनरल मॅनेजर श्री.वेठे यांना निवेदन देण्यात आले.

आजच्या डिजिटल युगात जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक शासकीय व दैनंदिन कामे ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. ग्रामपंचायतीतील मालमत्ता नोंदणी, विविध शासकीय योजनांची नोंदणी, रोजगारविषयक कामे, कर्मचाऱ्यांचे Work From Home, तसेच शालेय विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे ऑनलाइन शैक्षणिक कामकाज यासाठी इंटरनेट अत्यावश्यक झाले आहे.
मात्र, जांबोटी-वडगांव परिसरात नेटवर्क उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना इंटरनेट मिळवण्यासाठी चक्क एक किलोमीटरपर्यंत जावे लागत आहे. त्यामुळे शिक्षणासह नागरिकांच्या विविध ऑनलाइन कामांवर मोठा परिणाम होत आहे.

ही समस्या लक्षात घेऊन जांबोटी-वडगांव येथे भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) चा मोबाईल टॉवर उभारून गावाला आधुनिक डिजिटल कनेक्टिव्हिटीशी जोडण्यात यावे, अशी मागणी यापूर्वी तालुक्याचे आमदार यांच्याकडे करण्यात आली होती.
आमदाराच्या मार्गदर्शनाखाली वडगांव ग्रामस्थांच्या वतीने आज बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डी जी एम श्री देवेंद्र यांनी आठ दिवसांच्या आत जांबोटी-वडगांव परिसरात प्रत्यक्ष नेटवर्क सर्वेक्षण करण्यात येईल आणि सर्वेक्षणाच्या आधारे योग्य ती कार्यवाही करून गावची नेटवर्क समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

यावेळी सुनील देसाई माजी उपाध्यक्ष, जांबोटी ग्रामपंचायत
सागर नारायण दळवी अध्यक्ष, वडगांव शाळा सुधारणा समिती
जयवंत नारायण देसाई जांबोटी पी.के.पी.एस. चे चेअरमन आदी उपस्थित होते

Tags: