Belagavi

ऊसाला ५,५०० रुपये दर देण्यासाठी २९ सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलन

Share

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष आणि साखर कारखान्यांकडून होणारी फसवणूक याविरोधात २९ सप्टेंबर रोजी राज्यभर मोठे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते चुनप्पा पूजारी यांनी दिली.

प्रतिटन ऊसाला ५,५०० रुपये वैज्ञानिक दर आणि इथेनॉल खरेदीचे प्रमाण वाढवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. यासंदर्भात बेळगाव मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शेतकरी नेते चुनप्पा पूजारी म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून संकटात सापडलेल्या ऊस उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी शशिकांत गुरुजी, राजू शेट्टी आणि किशन नंदी यांच्यासह ३१ जिल्ह्यांतील शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल. ऊसाची आधारभूत किंमत वाढवून प्रतिटन ५,५०० रुपये दर निश्चित करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच श्रीमंत पाटील यांच्या मालकीच्या कारखान्यांसह बैलहोंगल आणि बागलकोट परिसरातील कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकीत पैसे तत्काळ द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री व साखर मंत्र्यांना दिला.

यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी गेल्या ९ वर्षांत साखरेचे दर वाढले नाहीत तर मग सत्ताधारी पक्षातील प्रभाकर कोरे यांच्यासारख्या नेत्यांनी आवाज का उठवला नाही, असा सवाल उपस्थित केला. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम उभे राहावे, अन्यथा एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

Tags: