बेळगावातील ढोर गल्लीत रेफ्रिजरेटरच्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील पीडित कुटुंबाला अद्याप कोणतीही सरकारी मदत मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेन्द्र आणि विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले तसेच सरकारकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.


बेळगावच्या चव्हाण गल्लीत गजानन धमोणे यांच्या घरातील रेफ्रिजरेटरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. या दुर्घटनेत गजानन धामोणे यांच्यासह कुटुंबातील सहा सदस्यांचा मृत्यू झाला. या घटनेवर शोक व्यक्त करताना भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेन्द्र यांनी एका गरीब कुटुंबावर असा प्रसंग ओढवणे अत्यंत वेदनादायी असल्याचे म्हटले. पीडित कुटुंबाला जिल्हा प्रशासनाकडून मदत मिळालेली नसल्याची माहिती मिळताच आर. अशोक यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून लवकरात लवकर योग्य ती भरपाई मिळवून देण्यासाठी विरोधी पक्ष आणि स्थानिक प्रशासनासोबत चर्चा करून प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया बी. वाय. विजयेन्द्र यांनी दिली.


दरम्यान, भाजपच्या वतीने पीडित कुटुंबाला मदत देण्यात आली आहे. नियमांनुसार जिल्हा प्रशासनाला थेट मदत जाहीर करण्याचा अधिकार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देणार असल्याचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी सांगितले.



Recent Comments