Belagavi

सवदत्ती तालुका दुष्काळग्रस्त घोषित होणारच

Share

सवदत्ती मतदारसंघात पावसाच्या अभावामुळे शेतकरी अत्यंत संकटात सापडले असून केंद्र सरकारने तातडीने निकष शिथिल करून सवदत्ती तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी आमदार विश्वास वैद्य यांनी केली.

यरगट्टी येथे पत्रकारांशी बोलताना आमदार विश्वास वैद्य म्हणाले की, तालुक्यातील भीषण परिस्थितीची माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. केंद्र सरकारने नियमावलीत शिथिलता दिल्यास सवदत्ती तालुका निश्चितपणे दुष्काळग्रस्त घोषित होईल. शेतकऱ्यांना सर्व शक्य ती मदत देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.

विरोधी पक्षांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर टप्प्याटप्प्याने तोडगा काढणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. सबस्टेशन आणि इतर स्थानिक समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दरम्यान, मंत्र्यांवर झालेल्या ईडीच्या कारवाईवर भाष्य करताना, सत्ताधारी नेत्यांची वाढती लोकप्रियता पाहून विरोधकांना पोटशूळ उठला आहे. या कारवाईतून काहीही निष्पन्न होणार नाही, मंत्र्यांकडे सर्व वैध कागदपत्रे असून ते कायदेशीर लढाई जिंकतील, असा विश्वास आमदार विश्वास वैद्य यांनी व्यक्त केला.

Tags: