बेळगाव मनपात जबरदस्तीने कन्नड समर्थक ठराव मंजूर करून घेण्यासाठी आणि सीमाप्रश्नावर भाषिक अन्याय लादण्यासाठी कन्नड संघटनांनी पुन्हा एकदा उचापती सुरू केल्या आहेत. जिल्हा कन्नड संघटनांच्या क्रिया समितीने प्रादेशिक आयुक्त जानकी के. एम. यांची भेट घेऊन मनपा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.

महानगरपालिकेची कोणतीही रीतसर मान्यता नसताना केवळ कर्नाटक सरकारच्या आदेशाचा बडगा दाखवून मनपाच्या बैठकीत कन्नड समर्थक ठराव मंजूर करून घेण्याचा अट्टहास या संघटनांकडून केला जात आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशाची अमलबजावणी तातडीने करा, अन्यथा मनपा आयुक्तांवर कारवाई करा, निरर्थक मागणी करत या संघटनांनी प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे.

बेळगावमधील मराठी भाषिकांचे बहुमत आणि त्यांच्या लोकशाही हक्कांना पायदळी तुडवत, मनपाचा कोणताही अधिकृत अजेंडा न ठरवता कन्नड ठराव जबरदस्तीने घुसडण्याचा हा प्रकार म्हणजे सीमाभागातील भाषिक शांतता बिघडवण्याचा डाव आहे.
नेहमीप्रमाणेच अशोक चंदरगी, महादेव तळवार, बलराम मासेनाट्टी, श्रीनिवास ताळूकर अशा मूठभर कन्नड वेदिकेच्या तथाकथित कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. कन्नड संघटनांच्या या सततच्या अरेरावीमुळे आणि पक्षपाती प्रशासकीय भूमिकेमुळे बेळगावच्या मराठी भाषिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.


Recent Comments