Belagavi

भजी तळून युवक काँग्रेसतर्फे पंतप्रधान मोदींचा वाढदिवस!

Share

रस्त्यावर भजी तळून तसेच हातगाडीवर फळे व भाज्यांची विक्री करत युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ‘बेरोजगारी दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.

बेळगाव येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवक काँग्रेसतर्फे हे अभिनव आंदोलन छेडण्यात आले. पदवीधर तरुणांच्या वेशात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर भजी तळली आणि हातगाडीवर भाजी-फळे विकून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला.

या वेळी ग्रामीण युवक काँग्रेस अध्यक्ष कार्तिक पाटील यांनी सांगितले की, “जिल्हा युवक काँग्रेसतर्फे पंतप्रधान मोदींचा वाढदिवस बेरोजगारी दिन म्हणून पाळला जात आहे. वर्षाला २ कोटी रोजगारांचे आश्वासन देऊन सत्तेत आलेले भाजप सरकार नोकऱ्या देण्यात अपयशी ठरले आहे. सरकारी नोकऱ्यांमधील रिक्त पदे भरली जात नसल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामाजिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला असून तरुण रस्त्यावर आले आहेत. परीक्षांमध्येही भ्रष्टाचार होत असून युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्या पंतप्रधानांनी देशातील तरुणांची माफी मागून तात्काळ बेरोजगारी दूर करावी.” तसेच तपास यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय सूडबुद्धीने कारवाया केल्या जात असल्याचा आरोप करत राष्ट्रपतींनी यात मध्यस्थी करावी, अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: