देशाच्या उभारणीत विश्वकर्मा समाजाचे योगदान अत्यंत मोठे असून या समाजाला राजकीय क्षेत्रातही योग्य प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन बेळगावचे खासदार जगदिश शेट्टर यांनी केले.


बेळगाव येथील कुमार गंधर्व कलामंदिरात आज बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड व संस्कृती विभाग तसेच महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने श्री विश्वकर्मा जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी खासदार जगदिश शेट्टर, भरमण्णा उप्पार यांच्यासह अन्य मान्यवरांनी भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला.


या वेळी बोलताना खासदार शेट्टर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा समाजासह विविध घटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना लागू केल्या आहेत. या सरकारी योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. यातील अडचणींबाबत पंतप्रधानांशी चर्चा करून त्या सोडवण्यासाठी आपण सदैव तयार आहोत. राजा-महाराजांच्या काळापासून देश घडवण्यात विश्वकर्मा समाजाचा मोठा वाटा राहिला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

व्याख्यात्या निर्मला बट्टल यांनी विश्वकर्मा समाजाचा ऐतिहासिक व पौराणिक वारसा विशद करत या कारागीर समाजाला समाजात योग्य स्थान व सोयीसुविधा मिळण्याची मागणी केली. उत्तर भारताप्रमाणे दक्षिण भारतातही ‘पीएम विश्वकर्मा योजना’ सुलभ रीतीने उपलब्ध करून द्यावी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय करावी, असे आवाहन त्यांनी सरकारला केले. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी (ADC) विजयकुमार होणकेरी, कन्नड व संस्कृती विभागाच्या उपसंचालक विद्यावती भजंत्री, समाजबांधव व नागरिक उपस्थित होते.



Recent Comments