State

कल्याण कर्नाटकसाठी मुख्यमंत्र्यांकडून 10 कल्याणकारी घोषणा!

Share

कल्याण कर्नाटक मुक्ती दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी या प्रदेशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी १० अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या.

गुलबर्गा येथे आयोजित ७९ व्या कल्याण कर्नाटक उत्सव दिनानिमित्त त्यांनी ध्वजारोहण करून मानवंदना स्वीकारली. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी रक्ताल्पता निर्मूलन मोहीम, एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, सेडम रोड उड्डाणपूल आणि ‘क्रिया’ (KRIYA) सेंटरची स्थापना करण्याची घोषणा केली.

कल्याण कर्नाटकच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकार दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांचा निधी देत आहे. राज्यघटनेतील कलम ३७१ (जे) मुळे या मागास भागाला मोठा न्याय मिळाला असून लवकरच ३२ हजार नवीन सरकारी पदांची भरती करून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असे डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले. यामध्ये ५० हजार भूखंडांचे वाटप, ३० एकर जागेवर अत्याधुनिक आयटी पार्क आणि हडगीली हारुती गावात भव्य क्रीडा नगरीच्या स्थापनेचादेखील समावेश आहे.

कलम ३७१ (जे) चा विशेष दर्जा मिळवून देण्यात सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे ऐतिहासिक योगदान असल्याचे त्यांनी आठवण करून दिली. या भागातील रस्ते विकासासाठी १ हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून ३५० केपीएस शाळांची निर्मिती केली जात आहे. आरोग्य आणि उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी स्थानिक जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला.

Tags: