Khanapur

खानापुरात भातशेतीत हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ!

Share

खानापूर वन उपविभागात गेल्या आठवड्याभरापासून फिरणाऱ्या हत्तींच्या कळपामुळे शेतकरी तीव्र घबराटीत आहेत. भीमगड वन्यजीव अभयारण्य क्षेत्रातील पाली गावातील भातशेतीत बुधवारी रात्री सात हत्तींचा कळप दिसून आला.

एकूण सुमारे ९ हत्ती असलेल्या या कळपात एकाकी हत्तीसह पिल्लांचाही समावेश असल्याने वनविभागाने विशेष खबरदारी घेतली आहे. सहाय्यक वनसंरक्षक (ACF) बसवराज वाळद आणि वनक्षेत्रपाल (RFO) सय्यदसाब नदाफ यांच्या नेतृत्वाखाली वन कर्मचाऱ्यांनी रात्रभर गस्त व शोधमोहीम राबवली. पाली, हेम्मडगा, अबनाळी, डोंगरगाव आणि शिरोलीवाडा परिसरात हत्तींचा वावर आढळून आला असून ड्रोनच्या साहाय्याने त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. हत्ती भातशेतातून वावरत असल्याने झालेल्या पिकांच्या नुकसानीची माहिती वनविभाग गोळा करत आहे.

हळियाळ, कॅसलरॉक, जगळपेठ, तिनईघाट आणि गणेशगुडी भागातून अन्नाच्या शोधात हे हत्ती आले असण्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी हत्तींच्या जवळ जाऊ नये, आरडाओरडा करून किंवा फटाके फोडून त्यांना भडकावू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. हत्तींच्या कळपाला सुरक्षितपणे जंगलात परत पाठवण्यासाठी निरंतर मोहीम राबवली जात असल्याची माहिती उपवनसंरक्षक (DCF) एन. ई. क्रांती यांनी दिली आहे.

Tags: